Monday, November 30, 2009

Friday, September 11, 2009

गडकोट - इतिहासाचे मूक साक्षीदार

 गडकोट - इतिहासाचे मूक साक्षीदार
मुंबईसारख्या महानगरामध्ये स्थानिक झालेली पण अजुनही मनानी कोकणच्या लाल मातीच्या कुशीत रेंगाळलेली अशी कितीतरी माणसे आहेत.  पोटाची खळगी भरण्यासाठी घड्याळ्याच्या काट्यांवर धावणारी प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीकडून गावाच्या, गावाकडील घराच्या, शांत सुंदर समुद्र किनाऱ्याच्या, त्यावर केलेल्या दंगामस्तीच्या गोष्टी ऐकत ऐकतच लहानाची मोठी होते. मोठे होत असताना आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देतानाच, सुट्टी लागली रे लागली की आज्जी, आजोबांकडे कधी जायचं, तिथे जाऊन काय काय करायचं, आई बाबांना कसा मस्का लावायचा, याची यादी मनातल्या मनात पक्की असते. कारण आपले आई बाबा हे गावात गेल्यावर आई बाबा न रहाता, मित्र मैत्रिण जास्त होतात हे प्रत्येकाला चांगलं माहिती असतं. गावाला जाताना प्रत्येक जण, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या, रोजची घड्याळ्यावर घावणारी पावले, सकाळी लवकर उठायचे म्हणुन घड्याळाला लावलेला गजर सगळं सगळं इथेच ठेऊन जातात. घरातुन एकदम कडक शिस्तीत निघणारी मोठ्ठी माणसं, गावाकडच्या मातीत पाऊल पडल्यापासुन मात्र नकळत लहान होतात. मग पतंग उडवणे, समुद्राच्या खोल पाण्यात चालत जाणे, रोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, विहिरीत पोहायला उतरणे, ह्या आणि अशा अनेक लहानपणी सुटलेल्या सगळ्या सवयींमध्ये पुन्हा रमतात. घरी ज्या त्या गोष्टींवरुन आपल्या मुलांवर डाफरणारी पिढी गावात जाऊन सगळ्या त्याच गोष्टी करत असते, आणि हे कमी की काय, म्हणुन आपल्या मुलांना अशा गोष्टी येत नाहीत म्हणुन चक्क त्यांना चिडवत असते. आजच्या मुलांवर कार्टुन, टि.व्ही., व्हिडियो गेम्स यांचा कितीही पगडा असला, तरी गावाला जायला मात्र एका पायावर तयार असतात. असं काय बरं आहे कोकणात? काळी लाल माती, दगड, धोंडे इतकचं? नाही, नक्कीच नाही, गावात आहेत ती साधी भोळी, प्रेमळ माणसे, शुद्ध हवा,स्वच्छ पाणी, लाल मातीची किनार असलेले डांबरी रस्ते, डोंगर, दऱ्या, घळी आणि किल्ले. शिवाजीराजांचे किल्ले, शिवरायांच्या मावळ्यांनी पाण्यासारखं रक्त वाहून जोपासलेले, संभाळलेले किल्ले. 

गड आणि किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवाचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे भुषण व प्रतिक समजले जाते. गड आणि किल्ल्यांशिवाय महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास पूर्ण होत नाही. गड किल्ल्यांचा अभेद्यपणा, शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान, शत्रुला जेरीस आणण्याची त्यांची ताकद, धोक्याच्या आणि संकटाच्या वेळी निसटुन जाण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्यातील चोरवाटा, शत्रुला बराच काळ झुंजवत ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य, त्यांचा बेलागपणा, असे सर्व गुण ओळखले ते छत्रपती शिवरायांनी.

छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि किल्ले यांचा तर अतुट संबंध आहेच, परंतु सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, बहामनी, शिलाहार, यादव, कदंब, मोगल, दक्षिणी पातशाह्या, हबशी, पोर्तुगीज यांचा ही दुर्गबांधणीत मोलाचा वाटा आहे.  किल्ल्यांची उभारणी आणि त्यांचा उपयोग यांचा विचार करता शिवकाल हा सुवर्णयुगच मानला पाहिजे. दुर्ग, गड, किल्ले हे पुर्वीच्या काळीही होते; परंतु शिवरायांनी गड-किल्ल्यांचे खरे महत्व ओळखले. गड, किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याला लाभलेले मोठे वरदानच. शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनाच्या, त्याचे सुराज्यात रुपांतर करण्याच्या, ते टिकवण्याच्या कार्यात गड-किल्ल्यांनी अतिशय मोलाची आणि अतुलनीय चोख कामगिरी बजावली.

बहुतांश मराठी भाषिक असलेल्या राज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो. पश्चिमेकडे अरबी समुद्र, त्यालाच चिकटून असलेले कोकण, घाटमाथा, पश्चिम घाट, पठार, खानदेश, मराठवाडा, विदर्भ हे जिल्हे म्हणजे ढोबळ्मानाने महाराष्ट्र. महाराष्ट्राची मांडणी पाहिली तर सह्याद्रीचे पूर्व-पश्चिम पसरलेले फाटे, उत्तरेला पश्चिमवाहिनी नर्मदेचे खोरे, त्यानंतर सातपुड्याच्या डोंगर रांगा, त्याच्या दक्षिणेस पश्चिमवाहिनी तापीचे खोरे. त्याच्याही दक्षिणेस अजंठा, सातमाळ्याची पर्वतराजी, त्यानंतर आहे गोदावरीचे खोरे, आणि त्याच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, मग भीमा नदीचे खोरे आणि कृष्णेचे खोरे एकदम वेगळे करणारी महादेव डोंगर रांग आणि उरलेला भाग. अशी आहे महाराष्ट्राची एकंदर रचना.

त्यामुळे, महाराष्ट्रात समुद्रातील बेटांवरचे किल्ले, किनारी किल्ले, सह्याद्रीच्या पश्चिमेचे किल्ले, सह्याद्रीच्या कण्यावरील किल्ले, सातपुडा, अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेवाचे डोंगर यांच्या शिरावरील किल्ले, पुर्वेकडील सपाट प्रदेशातील किल्ले, स्थानिक डॊंगर-टेकड्यांच्या माथ्यावरील किल्ले असे विविध किल्ले महाराष्ट्राच्या कुशीत आहेत. महाराष्ट्र हा दुर्गांचा देश, सह्याद्रित कुठेही उभे राहुन सभोवती नजर फिरवली, तरी प्रत्येक दोन-चार शिखरांच्याआड एखादं शिखर तट-बुरुजांचे शेले-पागोटी लेवुन थाटात उभे असलेले दिसते. यांतील अनेक दुर्गांनी शिवरायांची चरणधुळ आपल्या मस्तकावर मिरवली आहे. शिवस्पर्शांने पावन झालेली ही महाराष्ट्रातली तीर्थे आहेत. या बळवंत किल्ल्यांच्या आधारे महाराजांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी दिल्लीपतीला नामोहरम केले, आणि श्री. रामदासस्वामी यांनी शिवरायांवर आपल्या काव्यातून उधळलेली स्तुतीसुमने शब्दशहा खरी केली.

या भुमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहीला काही, तुम्हाकारणे ॥

साधारणपणे गड, किल्ले आणि दुर्ग हे तीनही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. खरं तर कोट हा शब्द भुईकोट किंवा गढी यांसाठी, दुर्ग हा सागरी किल्ल्यांसाठी, तर डोंगरी किल्ले अर्थात गिरिदुर्गांच्या नावात गड या शब्दाचा वापर केलेला दिसतो. तर काही ठिकाणी गड, किल्ला, दुर्ग असा कुठलाही वापर केलेला आढळत नाही, अशा वेळी रुढ भाषेत किल्ले असचं म्हटलं जातं. गड ह्या शब्दामध्ये चढावाचा अवघडपणा, दुर्ग शब्दात प्रवेशाची कठीणाई, आणि कोट शब्दामध्ये सभोवारची तटबंदी असा अर्थ सामावला असावा असे वाटते.

फार फार प्राचीन काळापासुन स्वसंरक्षणाची गरज ओळखून मानवाने विविध प्रकारचे किल्ले बनविले असावेत, त्याच बरोबर धान्य, जनावरे, मौल्यवान वस्तू, खजिना, स्वत:चे सैन्य, सैनिक, रयत यांच्या संरक्षणासाठी बळकट ठिकाणांची त्यांना गरज भासू लागली. त्यामुळे वस्तीच्या ठिकाणाला सर्व बाजुंनी बंदिस्त करुन शत्रुचा सहजासहजी प्रवेश होऊ न देणे हे या किल्ल्यांचे मुख्य उद्दिष्ट. किल्ल्याला ठेवलेल्या दरवाजांचे संरक्षण कमी व्यक्ती करु शकत असत, तसेच किल्ल्यात असलेले थोडेसे सैन्य किल्ल्याच्या सहाय्याने जास्त संख्येच्या शत्रुला तोंड देऊ शकत असे. प्राचीन काळापासूनच शहरांच्या, नगरांच्या संरक्षणासाठी विविध प्रकारच्या तटबंड्या उभारल्या जात. राजा आणि त्याचे कुटुंब, महत्वाच्या व्यक्ती, खजिना, धान्य, शस्त्रास्त्रे, लढाऊ सैन्य यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्ताची खास ठिकाणे असत.

किल्ल्यांच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याचे विविध प्रकार प्राचीन काळापासुन प्रसिद्ध आहेत.
१) भुदुर्ग - भुईकोट किल्ला.
२) जलदुर्ग - पाण्याने वेढलेल्या बेटावरचा किल्ला.
३) गिरिदुर्ग - डोंगरी किल्ला.
४) वनदुर्ग - दाट वनातील किल्ला.
५) नरदुर्ग - लढाऊ सैनिकांची रणांगणावरील रचना.

या सर्व किल्ल्यांमध्ये भुईकोटापेक्षा पाणकोट उत्तम व त्याहीपेक्षा डोंगरी किल्ला सर्वश्रेष्ठ मानला जात असे. कारण भुईकोटाला वेढा घालून तो जिंकणे व शत्रूला त्यातून निसटून जाणे कठीण. जलदुर्गातील अन्नपाण्याची रसद तोडणे त्यामानाने अवघड, पण हत्तींवरुन पूल बांधून किंवा नावांच्या मदतीने जलदुर्गाचाही पाडाव करता येत असे, डोंगरी किल्ल्यावर हल्ला करणे, तेथपर्यंत पोहोचणे किंवा तो उद्ध्वस्त करणे महाकठीण कर्म. आत असलेल्या सैन्याला साधे दगड फेकून, घोंडे लोटून किंवा झाडे फेकूनही आपला बचाव करता येत असे, म्हणुन डोंगरी किल्ला आश्रयासाठी उत्तम मानला गेला. 
भुईकोट : मोकळ्या मैदानात बांधलेला हा किल्ला खंदक, तटबंदी, मजबूत दरवाजे, जाडजुड भिंती, बुरुज यांनी संरक्षित केलेला असे.

जलदुर्ग : चारही बाजुंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला. पाण्यामधुन वाहतूक करणे जोखमीचे असल्याने तटबंदी, बुरुज अशा संरक्षणक्षम बांधकामानी सजवला जात असे.

गिरिदुर्ग : ऊंच डोंगरांवर असलेला हा किल्ला बिकट मार्गांमुळे, उंच उत्तुंग नैसर्गिक संरक्षणामुळे अभेद्य होत असे. तासलेले कडे, तटबंदी, बुरुज, अडचणीचे मार्ग, अस्त्र म्हणुन दगडगोट्यांचा होणारा मारा यामुळे गिरिदुर्ग जिंकण्यास अत्यंत कठीण होत असे.

वनदुर्ग : चारी बाजूंना असलेले घनदाट जंगल या किल्ल्याच्या संरक्षणाचे काम करी. प्रचंड वृक्ष, काटेरी जाळ्या, झुडुपे, जंगलातील हिंस्त्र आणि विषारी जनावरे यातून पार पडणे हे महाकठीण काम असे.

नरदुर्ग : प्रत्यक्ष रणांगणावर सैनिकांची केलेली रचना ( व्युहरचना ), तसेच सैन्याच्या आधारे केलेली लढाई बऱ्याच वेळेला निर्णायक ठरत असे. हत्ती, घोडे, गाडे ई. वाहनांनी आणि अस्त्रशस्त्रांनी सज्ज असलेला सैन्याभार म्हणजेच नरदुर्ग.

काही किल्ल्यांमध्ये या प्रकारातील दोन प्रकारची वैशिष्ठ्ये असत, त्यांना मिश्रदुर्ग म्हटले जात असे.

रयतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवून, सामान्य जनतेचा आत्मविश्वास जागा करुन, स्वधर्म रक्षणासाठी शिवरायांनी स्वराज्याचा उद्योग मांडला. स्वत:ची भूमी स्वतंत्र करण्यास अत्यंत आवश्यक असलेल्या किल्ल्यांचे महत्व शिवरायांनी जाणले. राजांचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच असायचे आणि त्यांचे सर्व सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरंवशावरच होते. ते खरेखुरे दुर्गस्वामी होते, त्यांचा जन्म दुर्गात झाला, त्यांना जे वैभव प्राप्त झाले ते सर्व दुर्गांच्यामुळे झाले आणि दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले ते शिवरायांच्या थोर प्रयत्नांमुळेच. त्यांचे दुर्ग म्हणजे स्वराज्याची संवर्धन भुमी असुन त्यांचा राजांच्या शत्रूंना धाक होता, हे दुर्ग राजांच्या दिग्विजयाचा पाया होते, त्यांच्या महत्वाकांक्षेची शिडी होते. दुर्ग हे त्यांचे निवासस्थान, त्यांच्या आनंदाचे निधान होते. 

किल्ले आणि स्थानिक प्रजेतून उभारलेले सैन्य कुठल्याही शक्तींशी सामना देऊन स्वातंत्र्य अबाधित ठेऊ शकते हे शिवरायांनी सिद्ध केले. या कार्यातील अत्यंत सामर्थ्यवान शक्ती म्हणजे सह्याद्री आणि त्यावर असलेले किल्ले. किल्ला आपल्या ताब्यात घेतला की त्याखालचा मुलुख आपोआपच ताब्यात येत असे. परस्परांशी जोडल्या गेलेल्या किल्ल्यांच्या मालिकेने मोठा भुभाग सहज नियंत्रणाखाली ठेवता येतो हे ऒळखून महाराजांनी किल्ल्यांना अतिशय महत्व दिले. जुने किल्ले ताब्यात घेऊन त्यांची पुनर्रचना, मजबुतीकरण याबरोबरच महाराजांनी मोक्याच्या जागा हेरुन असंख्य नविन किल्ले बांधले. शिवरायांनी किल्ले हे केवळ लष्करी ठाणे म्हणुन न वापरता राजकीय हालचालींचे केंद्र बनवले. किल्ल्या-किल्ल्यांवरुन लढलेल्या स्वातंत्र युद्धामुळेच मराठेशाही स्थापन झाली, जपली गेली आणि वाढवलीही गेली. प्रत्येक किल्ला व त्याच्या मर्यादेत येणारा प्रदेश हा राजांच्या राज्यमालिकेतील एक महत्वाचा घटक होता. या बहुमोल दुर्गमालिकेत राजांनी आपले राज्य बंदिस्त केले. राजांची बहुतेक अचाट कॄत्ये ह्या किल्ल्यांच्या योगाने तडीस गेली. नाना ठिकाणची लुट सुरक्षितपणे किल्ल्यांवर आणुन ठेवता आली. शिवरायांनी मिळवलेला बहुतेक पैसा या किल्ल्यांची बांधणी करुन ते सुरक्षित ठेवण्यात खर्च झाला. अनेक आणीबाणीचे प्रसंग शिवरायांवर आले असता, त्यातुन निभावून जाण्यास हेच किल्ले उपयोगी पडले. कित्येक किल्ले स्वसंरक्षणाच्या सोयीचे, तर कित्येक किल्ले अचानक शत्रुवर छापा घालून त्याचा पाडाव करण्याच्या सोयीचे, असे नावाजलेले असुन त्यांच्याच योगाने मराठ्यांच्या तत्कालीन पराक्रमांस एक विलक्षण रसाळता उत्पन्न झाली आहे.

शिवपुत्र संभाजीराजांनी रचलेल्या ’बुधभुषणम’ या ग्रंथात राजधानीसाठी वसवायच्या नगर दुर्गाविषयी तपशीलवार माहिती मिळते. 
 
मजबुत किल्ल्यात राजाने आपले मंदिर मध्यभागी व विपुल जल-वृक्षांनी वेढलेलेल असे बांधावे आणि आपल्या सर्व संपत्तीचे रक्षण करुन सुखे रहावे. गडातील राजमंदिरापासून चार दिशांना चार रस्ते बांधावेत. एका रस्त्याला देवभाग, दुसऱ्याला राजभाग, तिसऱ्याला धर्माधिकारणभाग आणि चवथ्याला गोपुरविभाग समजावे. गडात कोशगृह, गजशाला, अश्वशाला, पुरोहित-मंत्री-ज्योतिषी-वैद्य यांची घरे कशी आणि कुठे बांधावीत याचीही चर्चा येथे केलेली आढळते. हत्ती, घोडे, गाई - गुरे यांच्या व्यवस्थेसाठी सारथी, योद्धे, शिल्पी, मंत्री, काळ जाणणारे, पशुवैद्य इत्यादींची उत्तम व्यवस्था गडावर हवी. कुलशीलवान अशा आवश्यक लोकांव्यतिरिक्त इतरांना गडावर राहू देऊ नये, अशी सूचनाही येथे केलेली आढळते. 

किल्ल्याच्या रक्षणासाठी चांगली धनुष्ये, बाण, गोफणी, खडगे, चिलखते, त्रिशुळ, परशु, चक्रे, कुऱ्हाड, दोर इ. वस्तू ठेवाव्यात. कारागीर व शिल्पकार हे ही गडावर असावेत. वाद्ये, औषधे, विपुल गवत व सरपण, गूळ, सर्व प्रकारची तेले, दूध, चरबी, मज्जा, स्नायू, हाडे, चामडे, कापड, ताग, राळ, लाख, लाखेचे रंग व अडीअडचणीला लागणाऱ्या  सर्वच वस्तू पुरेशा प्रमाणात गडावर ठेवाव्यात. रत्ने, लोखंड, सर्व धान्ये, सातू, गूळ, गहू, मूग, उडीद, हरभरे, तीळ यांचा भरपूर साठा किल्ल्यांवर असावा. सर्व प्रकारचे गवत, माती, शेण, मातीचे रांजण पुरेशा प्रमाणात असावे. विषारी साप, सिंह, भुंगे, हिंस्त्र पक्षी तसेच विषाचे शमन करणारे लोक, विचित्र श्वापदे येथे बाळगावीत. कलावंत, चतूर माणसे, भूतपिशाच्च उतरवणारे मांत्रिक गडावर असू द्यावेत, पण भित्रे, रागिट, उग्र, उन्मत्त, अवमान करणारे, द्वाड नोकर, पापी, अनिष्ट माणसे यांना गडावर थारा देऊ नये. अडचण आली की व्यापारी, धनिक व त्यांची संपत्ती किल्ल्यात संरक्षणासाठी ठेवावी. युद्धात लागणाऱ्या व जगायला अती आवश्यक अशा सर्व वस्तू किल्ल्यात आवर्जून ठेवाव्यात. किल्ल्याचा प्रमुख अधिकारी म्हणजे हवालदार किंवा दुर्गाध्यक्ष शत्रुला हार न जाणारा, शुर, कमी बोलणारा, कुलशीलवान, कोणतेही काम करायला कायम तयार असणारा असेल तर गडावर राजाला सुखाने राहता येते.  
काही पौराणिक ग्रंथातुनही या बाबतीत तपशिलवार माहीती मिळते.

नगरदुर्ग किंवा राजधानीचे शहर देशाच्या मध्याभागी असावे. या ठिकाणी भरपूर पाणी असावे, म्हणुनच ते नदीचा संगम, सरोवर अशांची जवळीक साधुन वसवावे. त्याचा आकार देशकालस्थलपरत्वे गोल, लांबट किंवा चौकोनी असावा. जाण्यायेण्याचे मार्ग सुरक्षित असावेत. नगराभोवती खंदक खोदावेत, त्यांत कमळाचे वेल व मगरी असाव्यात. अनेक खंदकांची योजना करावी. सर्वात आतील खंदकाच्या आत सोयीस्कर तट बांधावा, त्याच्या बाहेर विषारी व काटेरी वेली असाव्यात.

तटाची रुंदी रथ चालवता येईल एवढी असावी. तटाच्या बांधकामात लाकूडकाम नसावे, कारण लाकूड जळण्याचा धोका असतो. तटावर व दरवाज्यावर आतून लक्ष ठेवण्यास व हत्यारमारी करण्यास सोयी असाव्यात. चोरवाटा, भुयारे यांची योजना केली जावी. 
 
तटबंदीयुक्त प्रांगणांत मध्यभागी राजवाडा असावा, त्यात विहीर असावी. दारांना अडसर असावेत. किल्ल्याच्या भोवती फेरी घालता येईल अशी वाट नसावी. किल्ल्यात तळधरे असावीत, त्यांत गोटे, कुदळी, कुऱ्हाडी, बाण, गदा, दंड, चक्रे, यंत्रे, लोखंडाची हत्यारे, त्रिशुळ, भाले, वाकड्या बांबूच्या काठ्या, आगीचे बाण, हत्ती, घोडे सजवायच्या वस्तु इ. नीट साठवून ठेवाव्यात.   

किल्ल्यावर पुर्ण अधिकार शिवरायांचा असे. त्यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेऊन परिक्षा करुन किल्ल्यावरील अधिकारी नेमले जात. गड तीन अधिकाऱ्यांच्या ताब्यात असे. मराठा हवालदार, ब्राम्हण सबनीस आणि प्रभू कारखानीस असे तीन जातींचे अधिकारी असत. हवालदाराचे काम किल्ल्याची रखवाली व बंदोबस्त करणे, सबनीसाकडे मुलुखातील जमाबंदी व किल्ल्याच्या अधिकारातील प्रदेशाची देखरेख करणे आणि कारखानीसाकडे किल्ल्यास लागणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करणे, साठा करणे, किल्ल्याची डागडुजी करणे ही कामे असत. किल्ल्याशेजारील मुलुखातील व्यक्ती अधिकारपदावर न ठेवणे, एकमेकांचे नातेवाईक असलेले अधिकारी एकमेकांपासून दुरवरच्या किल्ल्यांवर नेमणे, अचानक भेट देऊन किल्ल्यांच्या व्यवस्थेची पहाणी करणे, कुठल्याही कारणासाठी एकदा घालुन दिलेले नियम न मोडणे अशा अनेक प्रकारच्या उपायांनी शिवरायांनी किल्ले सतत जागते, लढते ठेवले. किल्ल्यांवरील नेमणुका वंशपरंपरेने होत नसत, कोणालाही खाजगी वस्तीसाठी कोट असलेले वाडे बांधायला परवानगी नव्हती, तर पुर्वीपासुन कोट असलेले वाडे, गढ्या शिवरायांनी पाडुन टाकल्या होत्या. 

किल्लांबाबतीत अभ्यास करताना, आपल्याला एका जुन्या शिवकालिन ग्रंथाचा आधार मिळतो, त्या ग्रंथाचे नाव आहे ’आज्ञापत्र’. आज्ञापत्राचा कर्ता म्हणुन रामचंद्रपंत अमात्य यांचे नाव घेतले जाते. रामचंद्रपंत अमात्य हे शिवराज्याभिषेकापुर्वीपासुन ते थेट शाहुमहाराजांच्या कारकिर्दीपर्यंत अमात्यपदी राहून कारभार पहात होते. पंतप्रधानपदापाठोपाठ अमात्यपद महत्वाचे मानले जाई. जमाखर्चावर देखरेख, फडणिसी व चिटणीसी, पत्रांवर निशाण करणे ही कामे अमात्यांकडे असत. राजाराम महाराज महाराष्ट्रातुन जिंजीकडे जाताना, रामचंद्रपंतांस ’हुकुमतपन्हा’ हा खिताब देऊन गेले, अर्थात विशेषप्रसंगी प्रत्यक्ष राजानेही त्यांचे ऐकावे असा हा मान होता. त्यानंतर पंतांचा उल्लेख ’समस्त राजकार्यधुरंदर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडीत अमात्य हुकुमतपन्हा’ असा केला जाई. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज अशा छत्रपतिंच्या कारकिर्दीचे साक्षी असणाऱ्या आणि काही काळ महाराष्टाच्या सर्वाधिकारीपदावर विराजमान असणाऱ्या ह्या बुद्धिमान व्यक्तीने गडांची साधारण रचना, देखभालीची व्यवस्था, गड सज्ज ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या आज्ञापत्रामधुन दिली आहे.

१. एका किल्ल्याच्या शेजारी दुसरा डोंगर नसावा, असला तरी सुरुंग लावून पाडून गडाच्या आहारी आणावा. जर या उपायाने कार्य नाही झाले तर तो डोंगरसुद्धा बांधकाम करुन दुसरा किल्लाच बनवावा. पुरंदर शेजारचा वज्रगड, रायगडासमोरील लिंगाणा, पन्हाळ्याशेजारचा पावनगड हे जोडकिल्ले याचे उत्तम उदाहरण आहेत.

२. गडाचे बांधकाम केवळ गरजेपुरते कामचलावू करु नये. जे काही बांधकाम करायचे ते जेथे जेथे आवश्यक असेल तेथे तेथे मजबूतीने बांधावे. नको असलेला भाग सुरुंगाने उडवून अवघड करुन टाकावा,

३. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन, येतेजाते मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा अयब आहे, दरवाजा बांधताना तो खालून किंवा समोरुन होणारा थेट मारा चुकवून, बुरुज आडवा बांधून रचावा. येणारे मार्ग बुरूजाच्या माऱ्यात येतील अशा पद्धतीने बुरुज रचावे. गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करुन ठेवाव्या. त्यामधे हमेश राबत्यास पाहिजे तितक्या ठेऊन वरकड दरवाजे व दिंड्या चिणुन टाकाव्यात. पन्हाळ्यावरुन सुटका करुन घेताना शिवराय मागील बाजुच्या राजदिंडीतुन बाहेर पडले, तसेच राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातुन चोरदरवाज्यातून निसटले.

४. भुईकोट जातीचा किल्ला असेल तर त्यास आधी सर्व प्रयत्ने दरवाज्यापुढे तटाखाली जितके मैदान असेल तितका खंदक खोल आणि रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबुत बांधोन त्यावर काही तोफा, जंबुरे ठेउन खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे असे करावे. गडावर यायचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. 

५.  झुंजामध्ये भांडीयांचे आवाजाखाली तोफांच्या गडगडाटामुळे झरे स्वल्प होतात, पाणी कमी होते आणि पाण्याचा खर्च विशेष लागतो, जास्त पाणी लागते तेव्हा संकट पडते, याकरीता तसे जागी जाखरीयाचे (साठवणीचे) पाणी म्हणुन दोन चार टाका तळी बांधावी, गडाचे पाणी बहुत जतन करुन राखावे. किल्ला बांधायच्या अगोदर, आधी त्या स्थानी पाणी उपलब्ध आहे हे पहावे. पाणी नसेल आणि त्याच ठिकाणी किल्ला बांधणे गरजेचे असेल, तर खडक फोडून, पोखरुन, उतारावर पक्का बांध वगैर घालून पाऊस चालू होईपर्यंत तरी गडावरुन पाण्याचा तुटवडा पडू नये याची काळजी घेतली जाई. किल्ल्यांवर आजही पाण्याच्या टाक्या, तलाव आपल्याला दिसतात. 

६. गडावर यायचे मार्ग अवघड करुन ठेवावेत, झाडी वाढवावी. गडाच्या सेवेत असणाऱ्या आणि सतत जा-ये करणाऱ्यास हे मार्ग अवघड वाटत नसत, पण शत्रुसैन्याला गड चढायची सवय नसल्यामुळे सैन्याची अर्धीअधिक ताकद गड चढण्यातच जायची.  

७. गडावर झाडे जी असतील ती राखावी. याविरहीत जी जी झाडे आहेत ती आंबा, फणस, चिंचा, वड, पिंपळ आदीकरुन थोर वृक्ष, निंबे, नारिंगे आदिकरुन लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली इ. गडावर जतन करावी. गडांवर आणि आसपासच्या परिसरात वेगवेगळी झाडे, औषधी वनस्पती यांची लागवड करुन त्यांचे जतन केले जात असे. त्यापासून फळे, लाकूड, औषधी, फुले अशा कितीतरी गोष्टी मिळवल्या जात असतं, उपयोगात आणल्या जात असतं.  

८. गडावरील धान्यगृहे, ईस्तादेची (चुन्याचे भक्कम बांधकाम असणारी) घरे ही सकळही अग्नि, उंदीर, किडा, मुंगी, वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडाची छावणी करुन गच्ची बांधावी.  

९. राजमंदिर म्हणजे राजाचे गडावरील निवासस्थान राजाच्या अनुपस्थितीतसुद्धा सतत स्वच्छ राखावे आणि या इमारतीपेक्षा इतर घरे उंच बांधु नयेत असा दंडक होता.

१०. गडावर जागोजागी होणारा केरकचरा गोळा करुन गडाखाली न टाकता, एकत्रित करुन जाळून ती राख गडावरील घरोघरी लावल्या जाणाऱ्या भाजीपाल्यात घालावी.  

११. दारुकोठाराची व्यवस्था अगदी जलरोधक, कडेकोट बंदोबस्ताची असे. शस्त्रे - अस्त्रे सतत केव्हाही वापरात यावीत अशा पध्दतीने जतन केलेली असत. शस्त्रांना नुकसान पोहोचू नये, यासाठी आठ-पंधरा दिवसांत हवालदाराने दारुगोळा, बाण, तलवारी, भाले वगैरे शस्त्रागाराच्या बाहेर काढून उन्हात व्यवस्थित तापवून परत मुद्रा लावुन ठाणबंद करावे अशी सक्त ताकीद होती.
 
१२. तटावर, तटामध्ये व तटाखाली वाढणारी झाडे सतत तोडून टाकीत असत. बांधकाम ढिले पडण्याबरोबर शत्रूस गुपचुप गडावर प्रवेश करण्याचा मार्ग अशा प्रकारे बंद केला जात असे.
 
१३. गडाच्या नाजुक जागा पाहुन त्या त्या ठिकाणच्या बुरुजांवर जुंबरे, बाण वगैरे शस्त्रे तैनात ठेवली जात असत. तोफांचे गाडे, तोफांचा भव्य आकार वगैरे पाहून त्या बुरुजांवर उंच कट्यांवर लोखंडी तटबंदीत ठेवल्या जात. दारुच्या पिशव्या, तोफगोळे, गरम तोफ निववायच्या कुंड्या (गरम तोफ लवकर थंड व्हावी म्हणुन तयार केलेली विशिष्ट खोळ), सुपारीप्रमाणे नदीतील लहानमोठ्या आकारांचे दगड, तोफा स्वच्छ करायचे सर्व सामान इ. सर्व जिन्नस हमेशा तोफा असलेल्या बुरुजांजवळ उपलब्ध असायचे. पर्जन्यकाळी तोफांस व तोफगाड्यास मेण लावुन तोफांचे कोने मेणाने भरुन त्यांच्यावर आच्छादन घालुन त्या खराब न होतील यांकडे विशेष लक्ष दिले जायचे.

१४. गडावर ब्राह्मण, ज्योतिषी, रसायनवैद्य, जखमा बांधणारे, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार त्यांच्या त्यांच्या हत्यारासकट रहात असत, ज्यावेळी त्यांच्या कौशल्याची गरज नसेल त्यावेळी या मंडळींकडुन गडावरील इतर चाकरी करवुन घेतली जात असे.
 
या आणि अशाच इतर गोष्टींमुळे गड स्वयंपुर्ण बनत असे, एक किल्ला म्हणजे जणू एक लष्करी शिबंदीने युक्त असे छोटे राज्यच बनत असे.

स्वराज्यातील जी जी स्थळे महाराजांना दुर्गम व सुंदर वाटली, त्या प्रत्येक स्थळी असलेले जुने दुर्ग त्यांनी अधिक उत्कृष्ठ बांधले, नवे निर्माण केले व मातीच्या गढ्या पाडून त्या ठिकाणी नवीन दुर्ग वसविले. नविन दुर्ग बांधण्यासाठी व जुने नीट करण्यासाठी महाराज पाण्यासारखा मुक्तहस्ताने पैसा खर्च करीत असत. जेथे जेथे कुशल स्थापत्यविशारद व कारागीर आढळेल, तेथुन तो आणवण्यासाठी ते अतिशय परिश्रम घेत. सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी पोर्तुगीज इंजिनीयरांचा उपयोग करुन घेतला. जिंजीच्या दुर्गासाठी त्यांनी मद्रासच्या इंग्रजांना स्थापत्यविशारद पाठविण्याविषयी लिहिले होते. स्वराज्यातील दुर्गबांधणी करणारे मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव अशा जाणकार लोकांनी या दुर्ग उभारणीत आपले सारे कौशल्य पणाला लावले, पण त्यांच्या स्थापत्यज्ञानाबद्दल ठासुन सांगता येईल अशी काहीही माहीती नाही. दुर्गरचनेचे शिक्षण त्यांनी कुठे घेतले, त्याचे आराखडे कसे बनवले, यासाठी त्यानी कोणते साहित्य-संदर्भ वापरले असावेत कल्पना नाही, काही काही सांगता येत नाही. मात्र विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या या स्थापत्याचा थोडाफार अभ्यास करता येतो, तो आज तग धरुन असलेल्या किल्ल्यांमुळे, आज्ञापत्र, राज्यव्यवहार कोश अशा आणि इतरही अनेक ग्रंथातुन त्याबद्दल केलेले लिखाण, काही दंतकथा; तर रायगडावर असलेल्या व्याडेश्वर उर्फ जगदीश्वराच्या समोरील पायरीवर कोरलेल्या शिलालेखातील उल्लेख इ. अस्तिंगत होत असलेल्या साधनांमुळेच.

शिवनिर्मित किल्ल्यांची प्रमुख वैशिष्ट्ये
 
प्रतापगड, राजगड, सिंधुदुर्ग, रायगड असे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आणि सिंहगड, पन्हाळा, जंजीरा अशा जुन्या किल्ल्यांची तुलना केली, तर काही वैशिष्टे सहज नजरेत भरतात.
 
१) डोंगरी किल्ल्यांची प्रमुख व बाह्य तटबंदी शिवनिर्मित किल्ल्यांवर पायथ्यापासून साधारणत: किल्ल्याच्या उंचीच्या २/३ उंचीवर बांधलेली दिसते, किल्ल्याचा मुख्य दरवाजाही याच तटबंदीत असतो. रायगडाचा मुख्य दरवाजा असणारी तटबंदी, टकमक टोक व हिरकणी बुरुजांच्या दरम्यान पायथ्यापासून २/३ उंचीवर आहे, तसेच प्रतापगडाची माची आणि बालेकिल्ला यामध्येही उंचीचा फरक आहे.

२) डोंगरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारी वाट डोंगर उजवीकडे ठेवुनच येते. शिवकालात किल्ले जिंकताना  बंदुका, धनुष्यबाण, भाले-तोफा यांचा जरी वापर होत असला, तरीही किल्ल्याचा मुख्य दरवाज्याशी होणारी लढाई ही प्रामुख्याने ढाल-तलवार वापरुनच होत असे. उजव्या हातात असणारी तलवार वार करण्यासाठी आणि डाव्या हातातली ढाल प्रतिस्पर्ध्यांचे वार झेलण्यासाठी वापरली जात असे. किल्ल्याकडे येताना उजवीकडे असलेला डोंगर, व तेथील तटबंदीवर बसलेल्या सैनिकांकडून छोटे मोठे दगड-गोटे, जळते बोळे, बाण, भाले, बंदुकीच्या गोळ्या इत्यादीं वस्तुंचा होणारा मारा या आफतीपासुन बचाव करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या हातात बांधलेल्या ढालीसारख्या संरक्षक कवचाचापण काहीही उपयोगे होते नसे. म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपुर्व आखली तर त्याचाही फायदा उठवता येतो, शत्रुंच्या अडचणीत भर टाकता येते असा बारीक सारीक तपशीलाचा दुर्गबांधणीत अभ्यास केलेला आढळतो.  जुन्या सिंहगड, पन्हाळा, विशाळगड वगैरे किल्ल्यावर नसलेली ही बांधणी रायगड, प्रतापगड वगैरे शिवनिर्मित किल्ल्यांवर मात्र आवर्जुन दिसते.    

३) किल्ल्याचं प्रत्यक्ष दार लपवलेले असुन, ते दर्शनी नसते. प्रवेशद्वार नक्की कुठे आहे, हे गडाखालुन सांगता येत नाही. प्रत्यक्ष दरवाजाची रचना शिवनिर्मित दुर्गावर ’गोमुखी’ बांधणीची आहे; दाराच्या बाजुचे बुरुज दाराच्या दोन्ही अंगाने पुढे वाढवायचे आणि एक बुरुज वळण देऊन दाराला मिठीत घेऊन दुसऱ्या बुरुजासमोर येईल अशी रचना म्हणजे गोमुखी रचना. काही किल्ल्यांवर, विशेषत: भुईकोट किल्ल्यांवर दार दिसू नये व थेट दारावर मारा करता येऊ नये म्हणुन दाराच्या समोर काही अंतरावर आणखी एक जाड भिंत किंवा बुरुज बांधला जाई. संरक्षणासाठी एकच दरवाजा पुरेसा नसल्यामुळे या दरवाज्याच्या मागे पुन्हा दरवाजे बांधले जात. एवढं करुनही मुख्य दरवाजा पडलाच, तर एकामागोमाग एक असणाऱ्या तटबंदीच्या जागा, चौक्या, त्यांच्यामधुन अंगावर येणारी वाट वगैरे रचना शत्रुसैन्याचं मनोधैर्य कमी करण्यात मोलाची मदत करत असत.

खरं तर प्रत्येक किल्लाच वैशिष्ट्यपुर्ण असतो, तरीही काही निवडक किल्ल्यांची वैशिष्टे अधिक ठळकपणे मनात भरतात, त्या त्या वैशिष्ट्यांसाठी तरी ते किल्ले पाहिले / अभ्यासिले गेलेच पाहीजेत. ’सह्याद्री’ या ग्रंथात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे अतुलनीय महत्व लिहिले गेले आहे, "वस्तुत: दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्याभोवती रेशमी कनाती लावतात. ह्या राजवाड्यांभोवती अशीच देखणी तटबंदी आहे. त्यांची तटबंदी सुंदर लालसर रंगाची आहे, त्यांच्या कंगोऱ्यांना किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का बसलेला नाही. या किल्ल्यांच्या अंतर्गत भागात संगमरवरी महालांच्या रांगा असून, त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. पृथ्वीवरील स्वर्ग स्वर्ग तो हाच, असे काही ऎकले ना म्हणजे उत्तर हिंदुस्तानातले लोग निश्वास सोडतात, पण बिचाऱ्यांच्या लक्षातही येत नाही की त्यांचा हा स्वर्ग त्यांच्याच पुर्वजांच्या मुडद्यांवर उभारलेला आहे. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिली नाही, येथे शस्त्रांची जी चमक दिसली ती फक्त खुनी खंजीरांची, मसलती झाल्याच असतील तर आप्तस्वकीय आणी हिंदुंच्या नि:पाताच्या. शाही वैभवांच्या या अवशेषांचे महत्व काय तर शोभिवंत पण निरुपयोगी सोन्यारुप्याच्या तोफांइतकेच. आग्राच्या किल्ल्यात जर कोणाची मर्दुमकी प्रकट झालीच असेल तर ती शिवरायांची. घन्य त्यांची की मोगल साम्रज्य वैभवाच्या कळसावर आणि सामर्थ्याच्या शिखरावर असताना, भरदरबारात या महायोध्याने औरंगजेबाचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जाहिर निषेध केला; त्यांच्या डोळ्यात धुळ फेकून स्वराज्यात परत आल्यावर त्यांनी मोगलांच्या प्रतिकारासाठी त्यांच्याच मुलुखातुन गोळा केलेल्या लुटीतून स्वातंत्र्यसाधनेसाठी जागोजागी दुर्दम्य, बेलाग व दुर्गम गड उभारले." 
 
महाराष्ट्राचे दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या या पहिल्या छत्रपतिंच्या किल्ल्यांमधूनच अनेकांनी प्रेरणा घेतली. अत्याचारी मोघल आणि कावेबाज इंग्रजांशी याच किल्ल्यांच्या मदतीने शेवटपर्यंत मराठी मन लढलं, त्यांची मनगटं पिचली, पण लाचार होणे हे मराठी रक्ताला कधीच मान्य नव्हते. याचाच परिणाम असा झाला की १७व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत या किल्ल्यांवर परकियांची अनेक आक्रमणे झाली, लढाया झाल्या, इथल्या तट बुरुजांवर तोफगोळ्यांचा भडिमार झाला, या किल्ल्यांमधुन निखळलेला प्रत्येक चिरा आपल्या स्वातंत्र्ययुद्धातील शौर्याची, बलिदानाची कहाणी सांगतो. ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष झालेल्या इमारती, भग्नावशेषातील टाकी हे किल्ल्यांचे आजचे दर्शन असले, तरी ही परीस्थिती स्वदेश-स्वधर्म-स्वराज्य यांच्या रक्षणासाठी केलेल्या हौतात्मातून निर्माण झाली आहे.उत्तरेतील तथाकथित राज्यकर्त्यांच्या नावात फक्त नावाचाच सिंह होता, स्वत:चे अंगभुत गुरगुरणे, आपल्या सावजावर निर्भयपणे झेप घेऊन त्याला कंठस्नान घालणे हे गुण विसरुन आपली गोंडेदार शेपटी दिल्लीच्या तक्तारुढ सत्ताधिशांपुढे हलवत, आपटत वर्षोंनवर्षे हे सिंह माना खाली घालुन उभे होते. त्यांच्या किल्ल्यांची आज असणारी उत्तम तब्बेत म्हणजे त्यांच्या निर्लज्जपणाची लक्तरे आहेत, स्वत:चे राज्य वाचवण्यासाठी आपल्या अस्तित्वाबरोबरच आपल्या लेकीबाळींना धर्मांध, अत्याचारी सुलतानांच्या जनानखान्यात लोटणारे तसेच त्यातच आपल्या राज्याचा उत्कर्ष आहे असे समजुन धन्यता वाटणारे हे ‘सिंह’. किल्ल्यांचा उपयोग लढण्यासाठी असतो हे विसरुन गेलेल्या राज्यकर्त्यांच्या सुंदर किल्ल्यांपेक्षा महाराष्ट्रातले ढासळलेले गडकोट जास्त मोहिनी घालतात, या ढासळलेल्या, पडलेल्या, उध्वस्त गड-कोट-किल्ल्यांबद्दलच समस्त मराठी मनांना आदर, प्रेम, अभिमान वाटतो.

रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे पाणी भरती मातीच्या घागरी
भीमतटीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा ।

भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभु राजा, दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा ।

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी ।
दारिद्राच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥या पुरातन वास्तुच्या अंगाखांद्यावरुन फिरताना महाराष्ट्राची थोरवी सांगणारी स्वातंत्रगीते मनात घर करुन रहातात, कारण काही अपरिहार्य कारणांसाठी शहरात स्थायिक झालेली माणसे, तनामनानी मावळेच असतात. शिवरायांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले आम्हा शिलेदारांना कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, कुठल्याही वादळाचा सामना करायची शक्ती देतात, आणि म्हणूनच प्रत्येक सुट्टीत आपल्या दुर्गमित्रांच्या सहवासाला आतुरलेली मने वाऱ्याच्या वेगाने गावाची वाट धरतात.  

Durg - Itihaasache Muk Sakshidaar

महाराष्ट्राचे दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या या पहिल्या छत्रपतिंच्या किल्ल्यांमधूनच अनेकांनी प्रेरणा घेतली. अत्याचारी मोघल आणि कावेबाज इंग्रजांशी याच किल्ल्यांच्या मदतीने शेवटपर्यंत मराठी मन लढलं, त्यांची मनगटं पिचली, पण लाचार होणे हे मराठी रक्ताला कधीच मान्य नव्हते. याचाच परिणाम असा झाला की १७व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत या किल्ल्यांवर परकियांची अनेक आक्रमणे झाली, लढाया झाल्या, इथल्या तट बुरुजांवर तोफगोळ्यांचा भडिमार झाला, या किल्ल्यांमधुन निखळलेला प्रत्येक चिरा आपल्या स्वातंत्र्ययुद्धातील शौर्याची, बलिदानाची कहाणी सांगतो. ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष झालेल्या इमारती, भग्नावशेषातील टाकी हे किल्ल्यांचे आजचे दर्शन असले, तरी ही परीस्थिती स्वदेश-स्वधर्म-स्वराज्य यांच्या रक्षणासाठी केलेल्या हौतात्मातून निर्माण झाली आहे.
उत्तरेतील तथाकथित राज्यकर्त्यांच्या नावात फक्त नावाचाच सिंह होता, स्वत:चे अंगभुत गुरगुरणे, आपल्या सावजावर निर्भयपणे झेप घेऊन त्याला कंठस्नान घालणे हे गुण विसरुन आपली गोंडेदार शेपटी दिल्लीच्या तक्तारुढ सत्ताधिशांपुढे हलवत, आपटत वर्षोंनवर्षे हे सिंह माना खाली घालुन उभे होते. त्यांच्या किल्ल्यांची आज असणारी उत्तम तब्बेत म्हणजे त्यांच्या निर्लज्जपणाची लक्तरे आहेत, स्वत:चे राज्य वाचवण्यासाठी आपल्या अस्तित्वाबरोबरच आपल्या लेकीबाळींना धर्मांध, अत्याचारी सुलतानांच्या जनानखान्यात लोटणारे तसेच त्यातच आपल्या राज्याचा उत्कर्ष आहे असे समजुन धन्यता वाटणारे हे ‘सिंह’. किल्ल्यांचा उपयोग लढण्यासाठी असतो हे विसरुन गेलेल्या राज्यकर्त्यांच्या सुंदर किल्ल्यांपेक्षा महाराष्ट्रातले ढासळलेले गडकोट जास्त मोहिनी घालतात, या ढासळलेल्या, पडलेल्या, उध्वस्त गड-कोट-किल्ल्यांबद्दलच समस्त मराठी मनांना आदर, प्रेम, अभिमान वाटतो.

रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे पाणी भरती मातीच्या घागरी
भीमतटीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा ।

भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभु राजा, दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा ।

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी ।
दारिद्राच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥
या पुरातन वास्तुच्या अंगाखांद्यावरुन फिरताना महाराष्ट्राची थोरवी सांगणारी स्वातंत्रगीते मनात घर करुन रहातात, कारण काही अपरिहार्य कारणांसाठी शहरात स्थायिक झालेली माणसे, तनामनानी मावळेच असतात. शिवरायांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले आम्हा शिलेदारांना कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, कुठल्याही वादळाचा सामना करायची शक्ती देतात, आणि म्हणूनच प्रत्येक सुट्टीत आपल्या दुर्गमित्रांच्या सहवासाला आतुरलेली मने वाऱ्याच्या वेगाने गावाची वाट धरतात.